Image Source:(Internet)
मुंबई :
अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वाटांवर असलेले ठाकरे बंधू अखेर आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करत मराठी राजकारणात नवा अध्याय उघडला आहे.
या घोषणेनंतर मनसेने रंगशारदा येथे विशेष मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांना थेट आदेश दिला. “युती झाली असली तरी काही जागांवरून चर्चा सुरू आहेत. मात्र मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी जागावाटपाचे आकडे क्षुल्लक आहेत. विजयालाच प्राधान्य द्या,” असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देताना स्पष्ट इशारा दिला. “कुणाला किती जागा मिळाल्या, यात वेळ घालवू नका. संकट ओळखा. आज आपण गाफील राहिलो तर उद्या मुंबई आपल्या हातातून जाईल. दुसऱ्यांची वाईट स्वप्ने गाडण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने मैदानात उतरले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले, “आज ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज आहे. पण लक्षात ठेवा, सत्तेत नसतानाही आपला दबदबा आजही कायम आहे.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात जोश संचारला.
आगामी निवडणुकांच्या तयारीचा सूर लावत राज ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. “आज उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात होईल. ते उत्साहात भरा. ही फक्त सुरुवात आहे. प्रत्यक्ष प्रचारसभांमध्ये मी सर्व गोष्टी पुराव्यासकट बाहेर काढणार आहे,” असा कानमंत्र त्यांनी दिला.
या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट)च्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर एकाच उद्देशाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांचे विभाजन थांबेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.