Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. उमेदवार निवडीवरून नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन करत थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांची गाडी अडवली. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील कार्यकर्ते पक्षाकडून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या काही नावांना विरोध करत आहेत. इतर पक्षातून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले नेते किंवा यापूर्वी सक्रिय नसलेल्यांना तिकीट देण्याची शक्यता असल्याने जुने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेरही जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपमध्ये उमेदवार निश्चितीसाठी बैठका सुरू असतानाच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘बाहेरच्यांना उमेदवारी नको’ अशी स्पष्ट भूमिका मांडत पालकमंत्र्यांसमोर आपला रोष व्यक्त केला.
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्यांना डावलले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. निवडणुकीच्या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते, ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. मेहनती आणि विश्वासू कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पक्ष नेतृत्वाने वेळेत दखल घेतली नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपसमोर अंतर्गत नाराजी आवरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.