Image Source:(Internet)
पिंपरी-चिंचवड :
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या एका थेट घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर करताच, या शहरात महाविकास आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पिंपरी येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ ही दोन्ही चिन्हे एका व्यासपीठावर आल्याचे स्पष्ट केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये पंकज भालेकर यांच्या पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ करताना त्यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी भरून निघत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाषणादरम्यान अजित पवार यांनी शहरातील राजकारणात सुरू असलेल्या दहशतवादासारख्या प्रवृत्ती आणि दादागिरीवर जोरदार टीका केली. “काही जणांची मक्तेदारी आणि दबावशाही मोडून काढण्याचा निर्धार आहे,” असे सांगत त्यांनी आमदार महेश लांडगे यांना स्पष्ट इशारा दिला.
दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये युतीबाबत संभ्रमाचे वातावरण होते. चिन्हांच्या वादामुळे पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत्या. शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी याला दुजोरा दिला होता. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत जागावाटपावर चर्चा केल्याची माहितीही समोर आली होती.
मात्र भाजपने पुणे व चिंचवडमध्ये अजित पवार गटासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असा दावा करणारे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचे विधान अखेर प्रत्यक्षात उतरल्याचे आता दिसत आहे.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली असून, ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंबही एकत्र येत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याचा आगामी महापालिका निवडणुकांवर मोठा आणि निर्णायक परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.