Image Source:(Internet)
नागपूर :
येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण सहमती झाली आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून, जागावाटपाची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी दिली.
महायुतीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, या बैठकीस शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, संजय राठोड आणि आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित जिल्ह्यांतील समन्वयक नेते उपस्थित होते. चारही महानगरपालिकांबाबत सखोल चर्चा होऊन जवळपास अंतिम तोडगा निघाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, अकोल्यात अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. अमरावतीत रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षासोबत युती होणार असून, चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादीशी हातमिळवणीचे संकेत आहेत. नागपूरमध्येभाजप–शिवसेना युतीवर एकमत झाले असले, तरी राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. माजी मंत्री हंसराज अहिर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अशोक नेते यांच्याकडे निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे. किशोर जोरगेवार निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील, तर दैनंदिन नियोजनाची जबाबदारी चैनसुख संचेती यांच्याकडे असेल.
चंद्रपूर संदर्भात बावनकुळे म्हणाले की, सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सुसंवाद साधण्यात आला. कोणताही वाद न होता समन्वयातून जागावाटपाचा मार्ग काढण्यात आला असून, उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसावा आणि भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता यावी, यासाठी महायुती पूर्ण ताकदीने लढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याची मोकळीक असून, अंतिम निर्णय सर्वांना मान्य असेल, असे स्पष्ट करत महानगरपालिका निवडणुकांत महायुतीला चांगले यश मिळेल, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.