शुभांगी अत्रेनं का सोडली ‘भाभीजी घर पर हैं’? अखेर समोर आलं खरं कारण

    26-Dec-2025
Total Views |
 
Shubhangi Atre
 Image Source:(Internet)
मुंबई :
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाभीजी घर पर हैं’मधील अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तब्बल दहा वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर शुभांगीने अखेर यामागचं खरं कारण उघड केलं आहे.
 
विकी लालवानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना शुभांगी अत्रेने स्पष्ट केलं की, दीर्घकाळ एकाच भूमिकेत अडकून राहिल्यामुळे एक कलाकार म्हणून आपली वाढ थांबली असल्याची जाणीव तिला होत होती. “मी पैसे कमावत होते, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत होतं; पण कलाकार म्हणून माझी भूक भागत नव्हती,” असं तिने प्रांजळपणे सांगितलं.
 
शुभांगीच्या निर्णयामागे तिच्या मुलीचीही महत्त्वाची भूमिका असल्याचं तिने नमूद केलं. “माझी मुलगी आशी ही माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि प्रामाणिक टीकाकार आहे. ती मला सतत सांगायची की, आता तुला वेगळ्या, हटके भूमिका करायला हव्यात एखादी पोलिस अधिकारी किंवा दमदार व्यक्तिरेखा साकार,” असं शुभांगी म्हणाली.
 
गेल्या दीड वर्षांपासून मालिका सोडण्याचा विचार मनात असल्याचं सांगत, “आता पुढे काय?” हा प्रश्न सतावत होता, मात्र योग्य क्षणाची वाट पाहत होते. अखेर मुलीच्या प्रेरणेमुळे हा धाडसी निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं.
 
दरम्यान, शुभांगी अत्रेनंतर पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘भाभीजी घर पर हैं’मध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत कमबॅक करत असल्याचीही चर्चा रंगली आहे. शुभांगीच्या या निर्णयामुळे तिच्या आगामी नव्या भूमिकांकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.