Image Source:(Internet)
पुणे :
महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप (BJP) यांच्यात युती होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
भाजपने पुणे महापालिकेसाठी शिवसेनेला सुरुवातीला केवळ 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र शिवसेनेकडून तब्बल 35 जागांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही.
पुण्यासाठी सन्मानजनक युतीचीच भूमिका – शिवसेना
पुणे महापालिकेत सन्मानजनक युती हवी, हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. चर्चेनंतर भाजपने जागांची संख्या वाढवत 15 जागांची ऑफर दिली असली, तरी शिवसेनेची अपेक्षा 20 ते 25 जागांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
उद्यापर्यंत निर्णय नाही, तर उमेदवार रिंगणात-
युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. मात्र उद्या सकाळपर्यंत भाजपकडून ठोस प्रतिसाद मिळाला नाही, तर शिवसेना आपले सक्षम उमेदवार थेट रिंगणात उतरवेल, असा इशाराही त्यांनी दिला. 29 तारखेला उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान-
दरम्यान, राज्यातील दीर्घकाळ रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदत संपलेल्या 27 आणि नव्याने स्थापन झालेल्या 2 अशा एकूण 29 महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत.
या सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली असून प्रचाराला जोर आला आहे. इच्छुक उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी सुरू केल्या असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.