Image Source:(Internet)
मुंबई :
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात” असे सूचक विधान शिरसाट यांनी केल्याने नव्या राजकीय शक्यतांना उधाण आले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असून जागा मर्यादित आहेत. त्यामुळे कोणता प्रभाग कोण लढवायचा, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेत चर्चा सुरू आहे. “आज किंवा उद्या महायुतीबाबतची अधिकृत घोषणा होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजप-शिवसेना युतीतून लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, केवळ दोन-चार जागांवर अजूनही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“युतीबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. कोण कुठून निवडणूक लढवणार, याची यादी एक-दोन दिवसांत निश्चित होईल. मंत्री अतुल सावे आणि मी आज अंतिम चर्चा करून ती यादी वरिष्ठांकडे पाठवणार आहोत. त्यानंतर ती जाहीर केली जाईल,” असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना शिरसाट यांनी थेट भाष्य केले. “शरद पवार फार काळ विरोधी पक्षात राहतील, असे वाटत नाही. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर त्यांनी अनेकदा अनपेक्षित राजकीय निर्णय घेतले आहेत,” असे ते म्हणाले. अजित पवार सत्तेत असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. मात्र, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला.
“शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचे की नाही, हा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत आघाडी आहे आणि आमची युतीही भाजपसोबत आहे. त्यामुळे भाजप शरद पवार यांच्याबाबत काय भूमिका घेते, हे भाजपच ठरवेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी शिरसाट म्हणाले, “इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील, तर त्याची जबाबदारी भाजपची असेल. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती आहे.”
या वक्तव्यामुळे शरद पवार यांच्या भविष्यातील राजकीय हालचालींबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.