Image Source:(Internet)
नागपूर :
कडबी चौक परिसरातील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ (Bubbles Kids Play Zone) ला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत प्ले झोनमधील खेळणी, सजावटीचे साहित्य व इतर उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या मुलांच्या प्ले झोनमध्ये अचानक आग भडकली. आगीचे लोळ दिसताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. वेळीच कारवाई झाल्याने आग शेजारील भागात पसरू शकली नाही.
घटनेच्या वेळी प्ले झोन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना जर कामकाजाच्या वेळेत घडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जरिपटका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अग्निशमन विभागाने विशेषतः मुलांसाठी असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.