Image Source:(Internet)
नागपूर :
नाताळ (Christmas) सणाच्या जल्लोषाला नागपुरात दुर्दैवी वळण लागले आहे. वर्धा रोडवरील प्राईड स्क्वेअर परिसरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या हिंसक प्रकारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
ख्रिसमसनिमित्त शहरातील क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे वर्धा रोडवरील एका प्रसिद्ध क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी होती. पार्टी आटोपल्यानंतर प्राईड स्क्वेअर हॉटेलजवळ उभ्या असलेल्या एका कारजवळ दोन गटांमध्ये आधी वाद झाला. काही वेळातच हा वाद उग्र बनत हाणामारीत रूपांतरित झाला.
या झटापटीदरम्यान मेहुल रहाटे या तरुणाने प्रणय नरेश नन्नावरे (वय २८, रा. महाल) आणि गौरव ब्रिजलाल करडा (वय ३४, रा. देवयोग अपार्टमेंट, कलमना रोड) यांच्यावर लोखंडी रॉड, विटा व धारदार हत्यारांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत दोघांनाही तत्काळ ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रणय नन्नावरे यांचा मृत्यू झाला. गौरव करडा यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या हिंसाचारामागील नेमके कारण काय होते आणि संपूर्ण प्रकार कसा घडला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.