नागपूरमध्ये युनियन बँकेला १.६५ कोटींचा फटका; माजी शाखा प्रमुखासह कर्मचारी अडचणीत

    25-Dec-2025
Total Views |
 
Union Bank
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर येथील युनियन बँक (Union Bank) ऑफ इंडियामध्ये १ कोटी ६५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी माजी शाखा प्रमुख आणि काही बँक कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी क्रेडिट कार्ड व इतर बँकिंग सुविधांचा गैरवापर करत नियमांना बगल देऊन व्यवहार केले. बनावट नोंदी, चुकीची मंजुरी आणि खात्यांतील फेरफारातून बँकेची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणी युनियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक संदीप मोतीलाल कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत अंतर्गत यंत्रणांचा गैरवापर आणि संगनमताने आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
सध्या पोलिसांकडून खाते व्यवहारांची छाननी, कागदपत्रांची तपासणी आणि डिजिटल पुराव्यांचा अभ्यास सुरू असून, या घोटाळ्यात आणखी व्यक्ती सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरातील बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली असून, बँक प्रशासनानेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.