Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात 26 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Pawar) महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
या चर्चांआधीच बारामतीतील एका कार्यक्रमाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हे केवळ
कार्यक्रमापुरते एकत्र येणे आहे की आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही संदेश दिला जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रविवारी बारामती येथे शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन पार पडणार आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार असून, ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित राहणार असल्याने पवार कुटुंब एकत्र येणार आहे. या दृश्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या महापालिकांवर पुन्हा पकड मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आघाडी जाहीर होण्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी असून, 26 डिसेंबर रोजी अजित पवार याबाबत स्पष्ट भूमिका मांडू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती हॉस्टेलमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा केली असल्याचे समजते.
यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, आता दोन राष्ट्रवादींच्या संभाव्य युतीमुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.