Image Source:(Internet)
मुंबई :
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव (Uddhav) ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
या युतीवर सत्ताधारी महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. “लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात, पण काही युती राज्य आणि जनतेच्या हितासाठी असतात. आमची महायुती गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. मात्र ही नवी युती केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे,” असा आरोप शिंदेंनी केला.
लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांचा दाखला देत शिंदे म्हणाले, “महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या नगराध्यक्षांच्या एकूण जागांपेक्षा एकट्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे या युतीचा उद्देश स्पष्ट आहे—स्वार्थ आणि सत्ता.”
मुंबईबाबत बोलताना शिंदेंनी ठाकरे बंधूंवर खोचक टोला लगावला. “काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खाल्ली, आता कोंबडी कापायला आले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, जागावाटप जाहीर न केल्यावर राज ठाकरे यांनी ‘पोरं पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत’ असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार?” असा थेट टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत असल्यावरही शिंदेंनी तीव्र टीका केली. “मराठी माणूस आत्ता आठवला? जेव्हा मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकललं गेलं, गिरणी कामगारांचे हाल झाले, तेव्हा कुठे होता? तुम्ही एक तरी गिरणी कामगाराला घर दिलंत का? आम्ही साडेबारा हजार लोकांना घरे दिली आहेत आणि एक लाख गिरणी कामगारांना घरे देणार आहोत. ३५ ते ४० लाख लोकांना क्लस्टर योजनेत सामावून घेणार आहोत. तुमच्याकडे अशी कोणती योजना आहे?” असा सवाल शिंदेंनी केला.
“इतकी वर्षे सत्ता उपभोगली, पण मुंबईकरांसाठी नेमकं काय केलं? मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीत त्यांना घोषणा नाही, तर विकास हवा आहे,” असेही शिंदे म्हणाले.
शेवटी, “हे लोक फक्त स्वतःसाठी काय मिळेल, याचाच विचार करत आहेत. म्हणूनच ते एकत्र आले आहेत.स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी,” अशी टीका करत शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार प्रहार केला.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महापालिका निवडणुकीत राजकीय तापमान वाढले असून, आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांची लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.