Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नुकतीच घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) निकाल येत्या १५ जानेवारीपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाणार आहे.
उत्तरसूची जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी परीक्षा परिषदेच्या वतीने केली जाईल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पूर्वी ‘टीईटी’ प्रमाणपत्रांबाबत बनावटगिरी, तसेच उत्तरपत्रिकांमध्ये गुण वाढविण्याचे प्रकार उघडकीस आल्याने, यंदा उत्तरपत्रिकांची दुहेरी तपासणी केली जात आहे.
खाजगी एजन्सीकडून ओएमआर शीटची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जात आहेत, जेणेकरून कोणताही गैरप्रकार घडू नये.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली परीक्षा घेण्यात आली. यंदा ‘टीईटी’च्या दोन्ही पेपरसाठी सुमारे साडेतीन लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत असलेल्या ५० हजारांहून अधिक
शिक्षकांनीही ‘टीईटी’ दिल्याने, निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उत्तरसूचीवर हरकतीसाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत
२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेच्या उत्तरसूचींचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, उत्तरसूची प्रसिद्ध केल्यानंतर २८ डिसेंबरपर्यंत हरकती व आक्षेप नोंदवण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर केली जाईल.
वर्षात दोनदा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय
आगामी वर्षात जून आणि नोव्हेंबर महिन्यात दोनदा ‘टीईटी’ परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार (सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेले वगळता) इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत शिक्षकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.