शेतकऱ्याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आले आंतरराष्ट्रीय अवयव तस्करीचे भयावह जाळे!

    24-Dec-2025
Total Views |
- स्वतःची किडनी विकूनच दलाल बनला ‘डॉ. क्रिष्णा’

organ traffickingImage Source:(Internet) 
मुंबई :
मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे याच्या किडनी विक्रीप्रकरणाने संपूर्ण यंत्रणाच हादरली असून, या घटनेतून देशाच्या सीमाही ओलांडणारे आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीचे (Organ trafficking) काळेबाज जाळे समोर आले आहे. या प्रकरणात एसआयटीने अटक केलेला कथित ‘डॉ. क्रिष्णा’ उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू हा केवळ मध्यस्थ नसून, या रॅकेटचा सक्रिय आणि महत्त्वाचा भाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
एका किडनीमागे तब्बल एक लाख रुपयांचे कमिशन मिळत असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना हेरून त्यांना किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करण्याचे काम रामकृष्ण करत होता. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत किमान १२ जणांना कंबोडियातील फ्नॉम पेन्ह येथील प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटलमध्ये किडनी विक्रीसाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या साखळीतील कोलकात्यातील मुख्य एजंट लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
 
२०१५ मध्ये व्यवसायात अपयश आल्यानंतर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रामकृष्णचा फेसबुकवरील ‘किडनी डोनर’ ग्रुपमधून या रॅकेटशी संपर्क झाला. २०१८ मध्ये तो कोलकात्यातील एजंटला भेटला आणि त्यानंतर कंबोडियाला गेला. तेथे त्याने स्वतःचीही किडनी विकली. या घटनेनंतर पीडिताची भूमिका मागे टाकत तो थेट अवयव तस्करीचा दलाल बनला. उच्चशिक्षित, इंग्रजीत प्रवीण असलेल्या रामकृष्णने ‘डॉ. क्रिष्णा’ या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत अनेकांना मृत्यूच्या छायेत ढकलले.
रोशन कुळेला किडनी विक्रीपोटी मिळालेले आठ लाख रुपये थेट भारतीय बँक खात्यात जमा झाल्याने तपास अधिक गंभीर बनला आहे. शस्त्रक्रिया कंबोडियात होत असताना भारतातील कोणत्या खात्यातून हे पैसे वळते करण्यात आले, त्या खात्याचा सूत्रधार कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. या आर्थिक व्यवहारांमागे मोठे संघटित नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.
 
दरम्यान, या प्रकरणाची चर्चा सुरू होताच ब्रह्मपुरीतील आरोपी सावकारांनी रोशन कुळेला तक्रार मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याची खळबळजनक चर्चा शहरात आहे. ही बाब सत्य ठरल्यास प्रकरण दडपण्यासाठी झालेल्या दबावाचा गंभीर पैलू समोर येणार आहे.
 
या तपासातून कोलकाता हे किडनी तस्करीचे प्रमुख केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंबोडियाला जाण्यापूर्वी रामकृष्ण आणि रोशन दोघांचीही भेट कोलकात्यात झाली होती. रोशनसोबत नाशिक, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील युवक तसेच बांगलादेशातील नागरिकांचाही या अवयव विक्रीच्या साखळीत समावेश होता. या उघडकीमुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मानवी अवयव तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.