मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांवर अजामीनपात्र अटक वॉरंट; कुडाळ न्यायालयाचा दणका

    24-Dec-2025
Total Views |
 
Nitesh Rane
 Image Source:(Internet)
कुडाळ :
कोरोना काळातील आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या बड्या नेत्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, राजन तेली यांच्यासह एकूण 42 जण आरोपी आहेत.
 
आज या प्रकरणाची सुनावणी कुडाळ न्यायालयात झाली. सुनावणीस आमदार निलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी उपस्थित होते. मात्र, मंत्री नितेश राणे आणि अन्य पाच आरोपी न्यायालयात गैरहजर राहिले. विशेष म्हणजे, मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने कठोर पवित्रा घेत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.
 
दरम्यान, नितेश राणे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला गैरहजेरीबाबतचा विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, असा स्पष्ट संदेश देत न्यायालयाने राजकीय नेत्यांनाही नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
 
या निर्णयामुळे भाजपसह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, पुढील काळात या प्रकरणाचा राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.