जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार; याच आठवड्यात घोषणा होण्याची दाट शक्यता

    23-Dec-2025
Total Views |
 
Zilla Parishad Elections
Image Source:(Internet) 
मुंबई :
राज्यात महापालिका निवडणुकांची (Elections) रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
 
महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. येत्या चार ते आठ दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या झेडपी निवडणुकांचा बिगुल याच आठवड्यात वाजण्याची शक्यता बळावली आहे.
 
राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, आरक्षणाच्या मुद्द्यामुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे.
 
रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, आता निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याचे संकेत मिळत आहेत.
आठवडाभरात तारीख जाहीर होणार?
 
नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची चर्चा पुन्हा रंगली आहे. याच दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी मंचर येथील शेवाळवाडी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद निवडणुका लवकरच जाहीर होतील, असा दावा केला. याआधीही त्यांनी नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा अचूक सांगितल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले जात आहे.
 
संभाव्य वेळापत्रक समोर
सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या अखेरीस राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
 
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सात दिवस अर्ज स्वीकृती, दोन दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत, त्यानंतर उमेदवारांची छाननी व अंतिम यादी जाहीर केली जाईल. २८ ते २९ जानेवारीदरम्यान मतदान आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, ३१ जानेवारीपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा मानस आहे.
 
एकूणच, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून, ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.