ठाकरेंनंतर पवारांचीही युती ठरली; 26 डिसेंबरला अजित पवार करणार अधिकृत घोषणा

    23-Dec-2025
Total Views |

 
Pawar alliance Ajit PawarImage Source:(Internet)

मुंबई/ पुणे: 
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतानाच, आता पुण्यात पवार (Pawar) कुटुंबातील दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा 26 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचा ताबा राखण्यासाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती उद्या दुपारी 12 वाजता अधिकृतपणे जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेचच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. “26 तारखेला सगळी माहिती समोर येईल, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलं.
 
पुण्यासाठी पवारांची हातमिळवणी?
पुणे महानगरपालिकेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचा प्रस्ताव तयार होत असल्याची माहिती आहे. या आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच ठाकरे गटाची शिवसेनाही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी हा प्रस्ताव अजित पवारांकडे मांडण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
 
दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनीही दिली आहे. 25 किंवा 26 डिसेंबर रोजी युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
प्रशांत जगतापांचा इशारा, पण हालचालींना वेग
दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला होता. मात्र त्यांच्या या भूमिकेचा युतीच्या हालचालींवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
 
प्रशांत जगताप यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांची एक गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीत शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे सहभागी झाले आहेत. पुणे महापालिका निवडणूक आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
महापालिका निवडणुकांत मोठे राजकीय धक्के बसणार?
मुंबईत ठाकरे बंधूंची युती आणि पुण्यात पवारांची हातमिळवणी प्रत्यक्षात आल्यास, महापालिका निवडणुकांत राज्यातील राजकारणाला मोठा कलाटणी देणारे चित्र पाहायला मिळू शकते. आता सर्वांच्या नजरा 26 डिसेंबरकडे लागल्या आहेत.