Image Source:(Internet)
जळगाव :
सोने (Gold) आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली वाढ आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ कायम राहिल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
माहितीनुसार, एका दिवसात सोन्याच्या किमतीत २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची भर पडली. यामुळे जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४० हजार ८० रुपयांवर गेला असून, चांदीचा भाव प्रति किलो २ लाख १६ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेतला असता, सोनं एकूण ११ हजार ५०० रुपयांनी महागले आहे, तर चांदीच्या किमतीत ५० हजार रुपयांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीला मिळणारी पसंती यामुळे दर वाढल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात.
या भाववाढीचा थेट परिणाम दागिने खरेदीवर झाला आहे. अनेक ग्राहकांनी खरेदीचा विचार पुढे ढकलला असून, वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेट कोलमडले आहे. परिणामी, काही ग्राहक सोन्या-चांदीऐवजी कृत्रिम दागिन्यांचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत.
दरम्यान, सोनं-चांदीचे दर आणखी वाढणार की स्थिर होणार, याबाबत बाजारात चर्चांना उधाण आले असून सर्वांचे लक्ष आगामी काळातील हालचालींकडे लागले आहे.