फास्ट फूडचे अति सेवन ठरले घातक; अकरावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

    23-Dec-2025
Total Views |
 
fast food student dies tragically
 Image Source:(Internet)
अमरोहा (उ.प्र.):
चाऊमीन, मॅगी, पिझ्झा, बर्गर यांसारख्या फास्ट फूड (Fast food) पदार्थांची सवय एका अल्पवयीन विद्यार्थिनीसाठी जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अमरोहामध्ये घडली आहे. अहाना नावाची १६ वर्षीय विद्यार्थिनी अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. फास्ट फूडचे सातत्याने सेवन केल्यामुळे तिच्या आतड्यांना गंभीर इजा झाली असून आतड्यांमध्ये छिद्र पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अहानाला फास्ट फूडची विशेष आवड होती. घरातून वारंवार समज दिली जात होती, तरीही ती अशा पदार्थांपासून दूर राहू शकली नाही. काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रकृतीत बिघाड जाणवू लागला. सप्टेंबरपासून पोटदुखीचा त्रास वाढत गेला. ३० नोव्हेंबर रोजी तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर तिला मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या आतड्यांमध्ये छिद्र असल्याचे निदान केले. फास्ट फूडच्या अति सेवनामुळे आतड्यांचे नुकसान झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ३० डिसेंबरच्या रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
 
मात्र, घरी परतल्यानंतरही तिची अशक्तपणा कमी झाला नाही. काही दिवसांनी तिची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर कुटुंबीयांनी तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिची तब्येत काहीशी स्थिर झाली होती आणि ती चालण्यासही सक्षम होती.
 
दरम्यान, रविवारी रात्री अचानक तिची प्रकृती गंभीर झाली आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, दीर्घकाळ फास्ट फूड खाल्ल्यामुळे तिच्या आतड्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा शेवट असा दुर्दैवी झाला.
 
या घटनेमुळे तरुणांमध्ये वाढत चाललेल्या फास्ट फूडच्या सवयींबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला असून, संतुलित आहाराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.