महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची कंबर कसली; ४० ‘स्टार’ प्रचारकांची फौज मैदानात

    23-Dec-2025
Total Views |
 
Municipal elections Congress
 Image Source:(Internet)
नागपूर:
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने प्रचाराची गती वाढवत आक्रमक रणनिती आखली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर पक्षाने तब्बल ४० प्रमुख ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर केली असून, निवडणूक प्रचाराला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. या यादीत राष्ट्रीय नेतृत्वासह राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेत्यांचा समतोल साधण्यात आला आहे.
 
काँग्रेसच्या प्रचार मोहिमेची धुरा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला सांभाळणार असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज आणि विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील हे प्रचारातील प्रमुख चेहरे असतील. राष्ट्रीय पातळीवरून खासदार मुकुल वास्निक, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीमुळे प्रचारसभांना धार येणार आहे.
 
वरिष्ठ नेत्यांच्या फळीत बाळासाहेब थोरात, तेलंगणचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश असून, संघटन बळकटीवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
 
अल्पसंख्याक मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि एआयसीसी सदस्य नसीम खान हे प्रचाराची सूत्रे हातात घेतील. याशिवाय अभिनेता व काँग्रेस नेते राज बब्बर, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम आणि भाई जगताप हे स्थानिक पातळीवर प्रचाराला रंगत आणणार आहेत.
 
तसेच अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, एम. एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि हनुमंत पवार यांचाही ‘स्टार’ प्रचारक म्हणून सहभाग राहणार आहे.
 
या प्रभावी प्रचारकांच्या उपस्थितीमुळे काँग्रेसची प्रचारयंत्रणा अधिक व्यापक आणि प्रभावी ठरेल, असा दावा पक्षनेत्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांत निर्णायक यश मिळवण्यासाठी उमेदवारांची अंतिम यादी आणि विशेष प्रचार कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.