चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरण: मुख्य आरोपीला सोलापुरातून अटक

    23-Dec-2025
Total Views |
 
Chandrapur kidney smuggling case
 Image Source:(Internet)
चंद्रपूर:
जिल्ह्यात उघडकीस आलेल्या किडनी तस्करी (Kidney smuggling) प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत रॅकेटच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे याच्या किडनी विक्री प्रकरणात स्वतःला डॉक्टर म्हणून भासवणारा रामकृष्ण मल्लेशम सुंचू याला रविवारी रात्री सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
 
पोलिस तपासात आरोपी कोणताही डॉक्टर नसून किडनी तस्करी करणारा दलाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, 2018 साली रामकृष्णने कंबोडियामध्ये पैशांच्या बदल्यात स्वतःची किडनी विकली होती. त्यानंतर तेथील काही डॉक्टरांनी भारतातून किडनी डोनर आणण्याचे काम त्याच्यावर सोपवले होते.
 
यानंतर आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैशांचे आमिष दाखवत किडनी विक्रीस प्रवृत्त केले. याच जाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे अडकला. कर्जबाजारी रोशनला कंबोडियाला नेऊन त्याची किडनी काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
आरोपीला अटक केल्यानंतर सोमवारी ब्रह्मपुरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 25 डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास एसआयटी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, या आंतरराष्ट्रीय रॅकेटमागे आणखी आरोपी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.