महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे मराठीतून आभार

    22-Dec-2025
Total Views |
 
PM Modi BJP Victory
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत भाजपसह महायुतीने मोठे यश संपादन केले आहे. या निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील जनतेचे आभार मानत कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.
 
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपने सर्वाधिक १२० नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ५८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ नगराध्यक्ष पदं मिळाली. या निकालांमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे. या यशामुळे भाजपसह केंद्रातील नेतृत्वातही उत्साहाचे वातावरण आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
“महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत भाजप आणि महायुतीवर विश्वास दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. लोकाभिमुख विकासाच्या आमच्या धोरणावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातील प्रत्येक घटकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या उमेदीने काम करत राहू. तळागाळात परिश्रम करणाऱ्या भाजप व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन.”
 
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले.
“महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांत महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार. हा कौल पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाला मिळालेला आशीर्वाद आहे,” असे शाह यांनी नमूद केले.
 
यासोबतच अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह एनडीएतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
या निकालांनंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल घडण्याची चिन्हे असून, विकासकेंद्रित धोरणांना आणखी वेग मिळेल, असा विश्वास भाजप नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.