नव्या शासकीय आदेशाने शिक्षण क्षेत्रात खळबळ; नियमभंग करणाऱ्या शिक्षकांची नोकरी जाणार

    22-Dec-2025
Total Views |
 
Teachers creates stir in education sector
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह मानसिक व शारीरिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शिक्षक (Teachers) आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी कठोर आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
 
विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक वागणूक, सौम्य व संयमित भाषा वापरणे, वेळेचे काटेकोर पालन आणि नियोजनबद्ध अध्यापन करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, पोषणमूल्ययुक्त आहार तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता ठेवण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
 
शाळा परिसरात गुंडगिरी, कोणत्याही प्रकारचा भेदभाव, तसेच मादक पदार्थांचे सेवन यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
 
विद्यार्थ्यांशी अनावश्यक वैयक्तिक संदेश, चॅट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, पालक व संबंधित प्राधिकरणाची परवानगी नसताना विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे व वापरणेही निषिद्ध ठरवण्यात आले आहे.
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळाव्यात आणि कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव येणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी तत्काळ लेखी नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू करणे अनिवार्य असेल. दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाकडे सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांत, विशेषतः पॉक्सो कायदा किंवा बाल न्याय अधिनियमाचे उल्लंघन आढळल्यास, २४ तासांच्या आत पोलिसांत गुन्हा दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
याशिवाय, संबंधित कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुराव्यांशी छेडछाड केली अथवा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्यास मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्धही थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.
 
एकूणच विद्यार्थ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, यामुळे राज्यातील शाळांमध्ये अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.