राज्यात भाजपचा दबदबा; १२९ नगराध्यक्षांसह सर्वाधिक वर्चस्व

    22-Dec-2025
Total Views |
- विभागनिहाय निकालांत महायुतीची सरशी ठळक

129 MayorsImage Source:(Internet) 
नागपूर :
महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. समोर आलेल्या अंतिम निकालांनुसार, राज्यभरात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी महायुतीला यश मिळाले असून, भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे १२९ नगराध्यक्ष (Mayors) आणि ३३०० हून अधिक नगरसेवक निवडून आणत स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
 
या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले असून, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे श्रेय संघटनेच्या ताकदीला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले. “विकास, स्थैर्य आणि विश्वासार्ह नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
विभागनिहाय पाहता, विदर्भात भाजपने ५८ नगराध्यक्ष निवडून आणत आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही १९ नगराध्यक्षांसह भाजपने भक्कम उपस्थिती नोंदवली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही भाजप आघाडीवर राहिला. कोकण विभागात मात्र शिवसेना (शिंदे गट) १० नगराध्यक्षांसह आघाडीवर राहिली असून भाजप दुसऱ्या स्थानावर आहे.
 
दरम्यान, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळूनही ५० नगराध्यक्षांचा टप्पा पार करता आलेला नाही.
 
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक २०२५ : विभागनिहाय चित्र
विदर्भ (१०० जागा):
भाजप – ५८ | काँग्रेस – २३ | शिवसेना (शिंदे) – ८ | राष्ट्रवादी (अजित पवार) – ७ | इतर – ४
पश्चिम महाराष्ट्र (६० जागा):
भाजप – १९ | शिवसेना (शिंदे) – १४ | राष्ट्रवादी (अजित पवार) – १४ | इतर – ६ | काँग्रेस – ३
मराठवाडा (५२ जागा):
भाजप – २५ | शिवसेना (शिंदे) – ८ | राष्ट्रवादी (अजित पवार) – ६ | काँग्रेस – ४ | शिवसेना (ठाकरे) – ४
उत्तर महाराष्ट्र (४९ जागा):
भाजप – १८ | शिवसेना (शिंदे) – ११ | राष्ट्रवादी (अजित पवार) – ७ | काँग्रेस – ५ | इतर – ५
कोकण (२७ जागा):
शिवसेना (शिंदे) – १० | भाजप – ९ | इतर – ४ | शिवसेना (ठाकरे) – २
एकूण नगराध्यक्ष (२८८)
भाजप – १२९ | शिवसेना (शिंदे) – ५१ | राष्ट्रवादी (अजित पवार) – ३५ | काँग्रेस – ३५ | इतर – २२
 
नगरसेवक संख्या : पक्षनिहाय
भाजप – ३३२५ | शिवसेना (शिंदे) – ६९५ | शिवसेना (ठाकरे) – ३७८ | राष्ट्रवादी (अजित पवार) – ३११ | काँग्रेस – १३१
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१७ मध्ये भाजपचे १६०२ नगरसेवक होते, आज ही संख्या दुप्पटहून अधिक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे यश आगामी महापालिका निवडणुकांसाठी दिशा दाखवणारे ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.