कुठे बोगस मतदारांचा संशय, तर कुठे ईव्हीएम ठप्प; मतदान प्रक्रियेला गालबोट

    20-Dec-2025
Total Views |

EVMsImage Source:(Internet) 
सोलापूर :
राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज, शनिवार (२० डिसेंबर) मतदान (Voting) होत आहे. यापूर्वी २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. त्यानुसार आज ही प्रक्रिया राबवली जात आहे.
 
अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूर जिल्ह्यातील अणगर व मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर व फलटण आदी नगरपरिषदांमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. थंडीमुळे पहाटे वातावरणात गारवा असला, तरी त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नसून मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे.
 
अंबरनाथमध्ये बोगस मतदारांचा संशय
अंबरनाथमधील कोहोजगाव परिसरात संशयित बोगस मतदार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. येथे तब्बल २०८ संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितांची आधार व पॅन कार्डच्या आधारे तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का आणि नेमक्या कोणत्या उद्देशाने आले होते, याची चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुमारे १४०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र ईव्हीएममध्ये बिघाड किंवा पैशांच्या वाटपाबाबत कोणतीही तक्रार नसल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
 
यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड
दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे मतदान काही काळ ठप्प झाले होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मशीन दुरुस्तीपर्यंत अनेकांना प्रतीक्षा करावी लागली.
मतदानाची टक्केवारी (सकाळी ९.३० पर्यंत)
– वाशिम नगरपरिषद : ६.५३ टक्के मतदान
– रिसोड नगरपरिषद (२ प्रभाग) : ८.४१ टक्के
– छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ८.९२ टक्के
– फुलंब्री नगरपंचायत : १२.४७ टक्के
– अंबरनाथ : सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५८ टक्के
– भुसावळ, यावल, सावदा : सकाळी १० वाजेपर्यंत ४.६ टक्के
– चंद्रपूर (घुग्गुस नगरपरिषद) : पहिल्या दोन तासांत ५.७ टक्के मतदान
 
दरम्यान, बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दिवसभरात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.