Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील २३ नगर परिषदा (Municipal councils) आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपद व सदस्यपदांसह एकूण १४३ जागांसाठी आज, शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांसाठीचा प्रचार काल, शुक्रवारी रात्री १० वाजता संपुष्टात आला होता.
आज सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. दोन टप्प्यांत ज्या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये निवडणूक झाली आहे, त्या सर्व ठिकाणी रविवार (दि. २१) रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित भागांत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी २८८ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, काही ठिकाणी उमेदवारांनी दाखल केलेल्या न्यायालयीन याचिकांवरील निर्णय विलंबाने लागल्याने, २३ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्याचा आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
या ठिकाणी मतदान-
नाशिक, पालघर, रत्नागिरी, ठाणे, अहिल्यानगर, जळगाव, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील निवडीत नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये आज मतदान होत आहे.
उद्या मतमोजणी होणार असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.