Image Source:(Internet)
कोच्ची :
मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक श्रीनिवासन (Srinivasan) यांचे शनिवारी सकाळी कोच्चीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी ही माहिती दिली.
श्रीनिवासन यांना शुक्रवारी रात्री त्रिपुनिथुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते.
मूळचे कन्नूर जिल्ह्यातील असलेले श्रीनिवासन गेल्या अनेक वर्षांपासून कोच्ची येथे वास्तव्यास होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक, पटकथालेखक, डबिंग कलाकार आणि निर्माता म्हणूनही सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले.
१९७६ साली ‘मणिमुझक्कम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. पुढील काळात त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
त्यांचे दोन पुत्र विनीत श्रीनिवासन आणि ध्यान श्रीनिवासन हेही मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. श्रीनिवासन यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.