Image Source:(Internet)
मुंबई :
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना (Teachers) आता अंगणवाडीतही अध्यापन करावे लागणार आहे. आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीत जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शालेय शिक्षण विभागाने नुकतेच जारी केले आहेत.
या आदेशानुसार प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील अंगणवाड्यांमध्ये जाऊन तेथील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करतील. विशेषतः पूर्व बालशिक्षण व संगोपन (ECCE) या बाबींवर भर देण्यात येणार असून, पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी प्रामुख्याने सोपवण्यात आली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी (पूर्व-प्राथमिक) आणि इयत्ता पहिली या दोन्ही स्तरांना एकत्रित मानले जाणार आहे.
त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांचा पाया तयार व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीकरिता देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘आकार अभ्यासक्रम’ तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात पूर्व-प्राथमिक शिक्षणाशी संबंधित धडे समाविष्ट असून, तो प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे.
राष्ट्रीय सण व कार्यक्रमांत अंगणवाडी मुलांचा सहभाग
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरे होणारे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, स्नेहसंमेलने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीतील मुलांनाही सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या संयुक्त स्वाक्षरीने मुलांना दिले जाईल. त्यानंतरच त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे.
“प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीतील मुलांनाही मूलभूत ज्ञान द्यावे, त्यातून अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत होईल आणि मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल,” असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.