Image Source:(Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देत, अंतिम सुनावणीपर्यंत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या परिस्थितीत कोकाटेंचं मंत्रीपद रिक्त राहण्याची शक्यता लक्षात घेता, अजित पवार गटातील राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती देण्याचा विचार नेतृत्व पातळीवर सुरू आहे. कोकाटेंकडे असलेली महत्त्वाची खाती इंद्रनील नाईकांकडे सोपवली जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.
इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री झाल्यास त्यांचं रिक्त होणारं राज्यमंत्रीपद कोणाला दिलं जाणार, यावरही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सना मलिक यांना ही संधी मिळू शकते, अशी माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. सना मलिक यांच्या नियुक्तीमुळे मुस्लिम, महिला आणि तरुण घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा संदेश पक्ष देऊ शकतो.
दरम्यान, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील अनेक नेते इच्छुक असल्याचं चित्र आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांच्यासह काही आमदारांची नावं चर्चेत असली, तरी काही वादग्रस्त बाबींमुळे पक्षात मतभेद असल्याचं बोललं जात आहे.
विदर्भाला कॅबिनेट मंत्रिपद देत प्रादेशिक समतोल साधण्याची रणनीतीही राष्ट्रवादीकडून आखली जात असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या इंद्रनील नाईक उद्योग, जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशी महत्त्वाची खाती सांभाळत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रवादीच्या कोट्यात मंत्रिमंडळात बदल आणि संभाव्य शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.