Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व पक्षांकडून रणनीती आखण्यावर भर दिला जात असून बैठका, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि संघटनात्मक हालचाली वेगाने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही मोठा वेग आला असून पुण्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसल्याची घडामोड समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बागुल यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांसह पुणे महापालिकेतील काही माजी लोकप्रतिनिधींनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद अधिक वाढली आहे.
या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की, गेल्या ३० वर्षांत त्यांनी विविध पदांवर काम करत जनतेशी नाळ जपली आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून केलेल्या कामाची दिशा पाहूनच त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांचं ‘स्लम फ्री पुणे, स्लम फ्री महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार करण्यासाठी बागुल यांचं योगदान महत्त्वाचं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथे सर्वांना समान वागणूक दिली जाते. पुण्याच्या विकासासाठी बागुल यांच्यासोबत काम करताना पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस अजून सावरलेली नसताना हा पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, माजी नगरसेवक राजेश मोरे, संजय सोनार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घडामोडीमुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच राजकीय समीकरणं बदलत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.