Image Source:(Internet)
नागपूर :
बुटीबोरी (Butibori) एमआयडीसी परिसरातील अवाडा कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतकांच्या कुटुंबीयांसह जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास कंपनीच्या आवारात काम सुरू असताना उभारणीतील टँक टॉवर अचानक कोसळला. या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. अपघाताच्या वेळी सौर पॅनल निर्मितीशी संबंधित काम सुरू होते. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला.
या अपघातात अरविंद कुमार ठाकूर, अशोक कंचन पटेल, अजय राजेश्वर पासवान, सुधांशू कुमार नागेश्वर साहणी, बुलेट कुमार इंद्रजित शाह आणि शमीम अन्सारी या सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतक आणि जखमी सर्वजण बिहारमधील विविध जिल्ह्यांतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, प्रत्येक मृत कामगाराच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रुपये देण्यात येणार असून जखमी कामगारांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्चही कंपनीकडून उचलला जाणार आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करण्यात येणार असून निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.