चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणावर बच्चू कडूंचा एल्गार; ३ जानेवारीला मोर्चा, नागभीड बंदचा इशारा

    20-Dec-2025
Total Views |
 
Bachchu Kadu
 Image Source:(Internet)
चंद्रपुर :
चंद्रपुर जिल्ह्यातील किडनी विक्रीच्या धक्कादायक घटनेनंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मिंथूर गावात जाऊन पीडित शेतकऱ्याची भेट घेतल्यानंतर कडू यांनी या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
 
हे प्रकरण केवळ स्थानिक नसून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत, विकासाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक समोर येत असल्याचे कडू म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे दावे केले जात असताना शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपले अवयव विकावे लागत असतील, तर ती अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री विदर्भातून येत असूनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
या प्रकरणात मानव तस्करीसारख्या कठोर कलमांचा समावेश करावा, तसेच स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. यासोबतच स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र सत्यशोधक समिती स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली.
 
अवैध सावकारी हा प्रश्न आता एका शेतकऱ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो राज्यव्यापी गंभीर समस्या बनल्याचे कडू यांनी सांगितले. याविरोधात ३ जानेवारी रोजी पीडित शेतकऱ्याच्या गावातून नागभीड तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून त्या दिवशी नागभीड बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
 
“पूर्वी शेतकरी जमीन विकायचा, आज परिस्थिती अशी आहे की त्याला स्वतःची किडनी विकावी लागत आहे, ही शासन व्यवस्थेची अपयशाची निशाणी आहे,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. या प्रकरणी एकही लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचला नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
काही सावकारांचे सत्ताधारी भाजपशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “रामाचे नाव घेऊन रावणाचे काम सुरू आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेस असो वा भाजप, सावकारीशी संबंध असलेल्या नेत्यांना सर्वच पक्षांनी हद्दपार केले पाहिजे.
 
हा प्रश्न जर धार्मिक रंग देण्यात आला असता तर कदाचित वेगळ्या पातळीवर घेतला गेला असता, मात्र तो शेतकऱ्यांचा असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी अद्याप दखल न घेणे अत्यंत खेदजनक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.