Image Source:(Internet)
गोंदिया :
नगर परिषदेच्या निवडणुकीत मंगळवारी (२ डिसेंबर) सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थोडा काळ मतदान थांबण्याची वेळ आली. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली असताना छोटा गोंदिया परिसरातील टेक्निकल विद्यालयातील केंद्रावर ईव्हीएम अचानक बंद पडल्यानं मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. सुमारे १० ते १५ मिनिटांनी पर्यायी मशीन बसवून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले.
याचदरम्यान प्रभाग क्र. २२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील रूम क्रमांक ४ येथेही दुपारी १२.५२ पासून मशीनने साथ सोडली. बटण काम न केल्याने मतदारांची रांग थांबली होती. तांत्रिक टीमने तत्काळ दुरुस्ती करून दुपारी १.३२ वाजता मशीन पुन्हा सुरू करण्यात आले आणि मतदान प्रक्रियेला गती मिळाली. सकाळी इतर दोन-तीन केंद्रांवरही अशाच समस्या उद्भवल्या; मात्र पर्यायी यंत्रांमुळे प्रक्रिया अडथळाविना सुरू राहिल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मानसी पाटील यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीतील विसंगतींचा त्रास कायम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार याद्यांमधील घोळही पुन्हा उघडकीस आला. मतदारांच्या चिठ्ठ्यांवरील क्रमांक आणि अधिकृत याद्यांतील क्रमांक न जुळल्याने अनेकांना गोंधळाला सामोरे जावे लागले. काही मतदारांनी तर परत जाण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांची तपासणी मोहीम
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इंजिन शेड आणि सिव्हिल लाईन येथील केंद्रांची पाहणी करून मतदानाची स्थिती जाणून घेतली. या दरम्यान काही उमेदवारांचे प्रतिनिधी केंद्राच्या आत फिरताना दिसल्याने त्यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले. मतदान परिसरापासून अंतर राखण्याच्या सूचना दिल्या.
मतदान केंद्रांवर उमेदवारांचा दांडगा वावर
निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी केवळ चार वेळा प्रवेशाची मर्यादा ठरवूनही अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र होते. काही उमेदवार वारंवार केंद्रात ये-जा करताना दिसले, तर काहींनी केंद्रातच ठिय्या मांडल्याचेही पाहायला मिळाले. नियमांचे खुले उल्लंघन होत असल्याची चर्चा मतदारांमध्ये होती.