महाडमध्ये शिंदेसेना–राष्ट्रवादी भिडंत; मतदानाच्या दिवशीच वातावरण तापलं

    02-Dec-2025
Total Views |
 
Shinde Sena-NCP clash
 Image Source:(Internet)
महाड (रायगड) :
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आज सकाळीच शिंदेसेना (Shinde Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळला. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या गोंधळात जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच जाबरे यांनी शिंदेसेना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला होता, त्यानंतर दोन्ही गटांत तणाव वाढला होता.
 
महाडमधील काही मतदान केंद्रांवर सुरुवातीलाच तांत्रिक अडचणींमुळे मतदान थांबावे लागले. ईव्हीएम बंद पडल्याने कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली आणि त्यातून परिस्थिती हाताबाहेर गेली. या धक्काबुक्कीत सुशांत जाबरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली असून जाबरे यांनी संतापाच्या भरात गोगावले समर्थकांना शस्त्र दाखवून धमकावल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
 
घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले,निवडणुकीत शांतता राखणे ही सर्व पक्षांची जबाबदारी आहे. मात्र काही जण सकाळपासून मतदान केंद्रांत विनाकारण हस्तक्षेप करत होते. हे संपूर्णपणे अयोग्य असून महाडसारख्या शहरात अशा प्रकारची दहशत निर्माण करणे अत्यंत खेदजनक आहे.”
 
तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर संकेतपूर्ण टीका करत म्हटलं,या गोंधळामागे कोण आहे, कोणाचे समर्थक आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. प्रशासनाने वेळेवर दक्षता घेतली असती तर अशी घटना घडली नसती.”
 
याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले,महाडमधील सामना टोकाचा असल्याचं आधीच दिसत होतं. नेत्यांनी संयमाचा संदेश दिला असता तर कार्यकर्ते पेटले नसते. निवडणुकीत मैत्रीपूर्ण वातावरण राहणं गरजेचं आहे.या घटनेनंतर महाड शहरात राजकीय तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त कडक केला आहे.