Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या (Elections) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी थेट आणि ज्वलंत शब्दांत हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी पक्ष निवडणुकांना खरेदीचा उद्योग बनवत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यभरात सुरू असलेल्या पैशांच्या उधळपट्टीला “लोकशाहीचा नंगा नाच” असे संबोधले.
पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणी रिक्षांमधून, कार्यालयांमध्ये तसेच बुथांच्या पातळीवर खुलेआम पैसे वाटले जात आहेत. “राज्याच्या नगरपालिका निवडणुकांचे चित्र अत्यंत भयावह झाले आहे. सत्ताधाऱ्यांचा हा पैसे वाटपाचा खेळ सुरू असताना पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोग मात्र हातावर हात ठेवून बसल्याचे दिसत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी ही परिस्थिती त्वरित थांबवून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.