– प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना
Image Source:(Internet)
मुंबई :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day) मुंबईत मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी डोळ्यासमोर ठेवत मध्य रेल्वेने यंदाही व्यापक नियोजन आखले आहे. ४ ते ८ डिसेंबरदरम्यान प्रवाशांची वाढणारी संख्या हाताळण्यासाठी १५ अनारक्षित मेल-एक्सप्रेस विशेष गाड्या आणि १२ उपनगरी अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर–मुंबई मार्गावर यंदा सर्वाधिक सेवा उपलब्ध असणार आहेत. नागपूर-सीएसएमटी, दादर-नागपूर, अमरावती-सीएसएमटी, कलबुर्गी-सीएसएमटी आणि कोल्हापूर-सीएसएमटी यांसारख्या मार्गांना या विशेष रचना जोडल्या जातील. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर–सीएसएमटी दरम्यान दोन दिवस सलग विशेष गाड्या सोडल्या जातील. यानंतर ६ ते ८ डिसेंबरदरम्यान सीएसएमटी–नागपूर दिशेने चार सेवा धावणार आहेत. या सर्व गाड्या अजनी, वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबतील.
कलबुर्गी–सीएसएमटी दरम्यान ५ आणि ७ डिसेंबरला दोन विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच अमरावती–मुंबई (५ व ६ डिसेंबर) आणि कोल्हापूर–मुंबई मार्गावरही विशेष गाड्या धावतील. या सर्व गाड्या अनारक्षित असून त्यांचे तिकीट यूटीएस अॅप किंवा रेल्वे काउंटरवर सामान्य दरात उपलब्ध असेल.
मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने स्टेशन्सवरील व्यवस्था अधिक कडक केली आहे. दादर स्थानकावर १०० पेक्षा अधिक कर्मचारी तैनात केले असून, महत्त्वाच्या स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसरात खास तिकिट बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री परळ–कल्याण, परळ–ठाणे, परळ–कुर्ला तसेच कुर्ला–वाशी/पनवेल या मार्गांवर १२ उपनगरी विशेष गाड्या धावतील. दोन्ही दिशांतील अप-डाउन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आणि उपलब्ध विशेष सेवांचा योग्य फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.