पोलिसांचे मनापासून अभिनंदन;सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    19-Dec-2025
Total Views |
 
Satara drugs factory case
 Image Source:(Internet)
सातारा :
साताऱ्यात (Satara) उघडकीस आलेल्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडली आहे. त्यांनी या कारवाईसाठी पोलिसांचे अभिनंदन करत विरोधकांच्या आरोपांवरही थेट भाष्य केले.
 
साताऱ्यातील सावरी गावात एमडी (मेफेड्रोन) तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेने काही महत्त्वाचे खुलासे केले असून, दरेगावचे सरपंच रणजित शिंदे यांचा आतापर्यंतच्या तपासात कोणताही संबंध आढळून आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
दरम्यान, या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. मात्र, प्रकाश शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत राजकीय द्वेषातून आपले नाव गोवले जात असल्याचा दावा केला आहे. संबंधित ड्रग्ज कारखाना किंवा ती जमीन आपली नसून, छापा पडलेली जागा आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या प्रकरणात ओंकार तुकाराम डिगे याचा उल्लेख समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, त्याचा गुन्ह्यात थेट सहभाग सिद्ध न झाल्याने अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कारखान्यातील कामगारांकडे केवळ सहा हजार रुपये सापडल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
 
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. चालू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न चुकीचा, अयोग्य आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध आढळलेला नाही. तरीही या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सुरू आहे.”
 
दरम्यान, पत्रकारांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की,
 
“माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.सातारा ड्रग्ज प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, येत्या काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.