Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी (Butibori) एमआयडीसी परिसरात असलेल्या आवाडा कंपनीच्या आवारात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. निर्माणाधीन पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू, तर सहा कामगार जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना काही कामगार टाकीच्या आसपास काम करत होते. त्याचवेळी टाकीचा तोल गेला आणि ती अचानक कोसळली. टाकीखाली अनेक कामगार अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवले. पोलिस, अग्निशमन दल तसेच आपत्कालीन मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच बचाव कार्य हाती घेऊन अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले.
जखमी कामगारांना नागपूरमधील विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.