Image Source:(Internet)
मुंबई :
देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे–राज ठाकरे (Thackeray) यांची संभाव्य आघाडी, तर दुसरीकडे भाजप–एकनाथ शिंदे गट अशी थेट लढत रंगणार असल्याचं चित्र आहे. मात्र, सध्याची आकडेमोड पाहता मुंबई शहर भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं जड असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
मराठी मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असलेल्या या निवडणुकीत मराठीबहुल प्रभागांमधील ट्रेण्ड शिंदे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. विशेषतः मुंबई शहर भागात शिंदेंच्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचीच लढाई उभी ठाकली आहे.
आकडे नेमकं काय सांगतात?
मुंबई शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या भागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आजही कायम आहे. शहरातील मराठीबहुल प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे तब्बल २२ माजी नगरसेवक आहेत. याउलट शिंदे गटाकडे केवळ ६ माजी नगरसेवक गेले आहेत.
शहर भागातील १० विधानसभा मतदारसंघांपैकी ४ ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विजयी झाले, तर शिंदे गटाला एकाही मतदारसंघात यश मिळालेलं नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत शिंदे गटासाठी ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे.
२०१७ च्या पालिका निवडणुकीतील स्थिती-
२०१७ मध्ये शहरातील ५६ प्रभागांमध्ये
शिवसेना (एकसंघ) – २६
भाजप – १४
काँग्रेस – ११
मनसे – २
समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘अभासे’ – प्रत्येकी १
अशी रचना होती.
शिंदे गटाकडे केवळ ११ माजी नगरसेवक-
पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसेनेचे २०, तर मनसे आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण २२ माजी नगरसेवक आहेत.तर शिंदे गटात शिवसेनेचे ६, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी व मनसेचे प्रत्येकी एक असे ११ माजी नगरसेवक दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी आणि मनसेची मुंबईत अवस्था बिकट-
भाजपकडे १४ माजी नगरसेवकांसह काँग्रेसमधून आलेले २ असे एकूण १६ माजी नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या ११ पैकी केवळ ५ माजी नगरसेवक पक्षासोबत राहिले आहेत.
विशेष म्हणजे, मुंबईत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) यांच्याकडे सध्या एकही माजी नगरसेवक उरलेला नाही.
मताधिक्य मिळवणारे प्रभाग ठाकरेंच्या बाजूने-
२०१७ मध्ये शिवसेनेच्या २६ नगरसेवकांपैकी सर्वाधिक मते मिळवणारे पहिले पाच नगरसेवक हे शिवडी आणि वरळी या मराठीबहुल मतदारसंघांतील होते. तसेच १८ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत प्रभावी उपस्थिती दाखवली होती.
भाजपचा गुजराती प्रभागांवर दबदबा-
गुजराती मतदारसंख्येचे वर्चस्व असलेल्या सातही प्रभागांत भाजपने बाजी मारली, तर मुस्लिमबहुल १६ प्रभागांपैकी ९ मध्ये काँग्रेस, ३ भाजप, २ शिवसेना आणि प्रत्येकी एक समाजवादी पार्टी, अभासे व राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची परीक्षा-
एकूण आकडेमोड पाहता संघटनात्मक ताकद, माजी नगरसेवकांची संख्या आणि मतदारांचा विश्वास या तिन्ही आघाड्यांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई शहरात मजबूत स्थितीत आहे. त्यातच मनसेची साथ लाभल्यास ठाकरेंचा बालेकिल्ला अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणार, हे निश्चित.