ड्रग्स प्रकरणावर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव पुढे,राजकीय वातावरण तापले

    18-Dec-2025
Total Views |
 
DyCM Shinde Sushma Andhare
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील कथित ड्रग्स रॅकेटच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित व्यक्तींची नावे घेत अंधारेंनी थेट आरोप केले असून, या प्रकरणाची दखल राज्य सरकारला घ्यावीच लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
सुषमा अंधारे यांनी दावा केला की, या कथित ड्रग्स व्यवहारात प्रकाश शिंदे यांचे नाव समोर येत आहे. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावा करत, “ही पत्रकार परिषद राजकीय सूडासाठी नाही, तर राज्याच्या सुरक्षिततेशी आणि भवितव्याशी संबंधित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे थेट संरक्षणाची मागणीही केली.
 
“या प्रकरणावर बोलल्यामुळे माझ्यावरही कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधी काही नेत्यांच्या बाबतीत जे घडलं, ते सर्वांनी पाहिलं आहे,” असे सांगत अंधारेंनी आपली भीतीही व्यक्त केली.
 
अंधारेंच्या म्हणण्यानुसार, १३ तारखेला ड्रग्सप्रकरणी तीन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. वर्धा, मुंबईतील मुलुंड आणि पुणे येथे या धडक कारवाया झाल्या असून, त्यातील सर्वात महत्त्वाची कारवाई साताऱ्याजवळील सावरी गावात झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
 
४५ किलो ड्रग्स जप्तीचा दावा; किंमत ११५ कोटी रुपये-
सावरी गावातील कारवाईदरम्यान तब्बल ४५ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ११५ कोटी रुपये असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. “मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहिली आहे,” असे सांगत त्यांनी संबंधित रिसॉर्ट हा प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा असल्याचा आरोप केला. ज्या शेडमध्ये ड्रग्स सापडले, तो शेड गोविंद शिंदकर यांच्या नावावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
या प्रकरणात ओमकार डीगे या व्यक्तीकडे शेडची चावी होती. त्याला ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आल्याचा आरोप करत, “या संपूर्ण प्रकरणात कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
FIR सार्वजनिक का नाही? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न-
अंधारेंनी पोलिसांच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला. “FIR हा सार्वजनिक दस्तऐवज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरीही ही FIR ऑनलाइन उपलब्ध का नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या अधिकृत प्रेस नोटमध्ये तीन नावे मुद्दाम वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम आणि खलील रेहमान ही नावे का लपवली जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
 
तसेच, या शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना जेवण प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून पुरवले जात होते, असा दावाही अंधारेंनी केला. या कथित रॅकेटमध्ये परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करत, “हे लोक इथे कसे आले आणि कोणाच्या आश्रयाने हे सर्व सुरू आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.दरम्यान, संबंधित आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.