कठोर भूमिका स्वागतार्ह; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    18-Dec-2025
Total Views |
 
Supriya Sule reaction to CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अलीकडेच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत राज्याच्या राजकारणात लक्ष वेधून घेतले आहे. सर्वप्रथम त्यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले राम सुतार यांनी दिल्लीत राहूनही महाराष्ट्राची कला आणि ओळख जागतिक पातळीवर पोहोचवली, असे गौरवोद्गार सुळे यांनी काढले.
 
यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या पदभारावरून काढण्यात आलेल्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय आणि विरोधकांसाठी वेगळा न्याय, हे दुर्दैवाने आजही देशातील वास्तव असल्याची टीका त्यांनी केली. “पोर्टफोलिओ नसतानाही मंत्री म्हणून कामकाज सुरू राहणं, हे महाराष्ट्रातलं एक नवं मॉडेलच आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
 
तथापि, या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी कठोर भूमिका घेत माणिकराव कोकाटे यांच्याकडील पदभार काढून घेतल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले. “हा निर्णय स्वागतार्ह असून, उशिरा का होईना न्यायाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे,” असे त्या म्हणाल्या.
 
या संपूर्ण प्रकरणात एका लेकीने आपल्या वडिलांसाठी अनेक वर्षे संघर्ष केला असून, तिला अखेर न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त करत सुळे यांनी या लढ्याचेही विशेष उल्लेख केले. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.