Image Source:(Internet)
मुंबई :
अनुभवी व्यावसायिकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) थेट नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयने लेटरल एन्ट्रीद्वारे भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, आयटी, पर्यवेक्षण आणि जोखीम व्यवस्थापन क्षेत्रातील एकूण ९३ तज्ज्ञ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
ही भरती ग्रेड ‘सी’ स्तरावरील पदांसाठी असून डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, आयटी व सायबर सुरक्षा तज्ज्ञ, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क प्रशासक, प्रोजेक्ट मॅनेजर, रिस्क अकाउंटंट तसेच क्रेडिट रिस्क स्पेशालिस्ट अशा विविध पदांचा समावेश आहे.
संबंधित क्षेत्रातील पदवी व अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना आणि सायबर धोक्यांची तीव्रता वाढत असल्याने आरबीआयकडून तज्ज्ञ मनुष्यबळावर भर दिला जात आहे. या भरतीमुळे बँकेच्या तांत्रिक क्षमता व धोरणात्मक कामकाज अधिक मजबूत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अर्ज प्रक्रिया दि. १७ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. ६ जानेवारी २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर www.rbi.org.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
पात्रता व निवड पद्धत
प्रत्येक पदासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. डेटा सायंटिस्ट पदासाठी सांख्यिकी, अर्थशास्त्र, गणित, डेटा सायन्स, फायनान्स किंवा संगणक विज्ञानातील पदवी/पदव्युत्तर शिक्षणासह किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डेटा इंजिनिअर पदासाठी बीई/बीटेक, एमसीए किंवा एमटेक (आयटी/कॉम्प्युटर सायन्स) आवश्यक आहे. वयोमर्यादा पदानुसार २५ ते ४० वर्षांदरम्यान असून काही पदांसाठी कमाल वय ६० वर्षांपर्यंत ठेवण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया प्राथमिक तपासणी, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रांची पडताळणी आणि थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. ही पूर्णवेळ कंत्राटी स्वरूपाची नोकरी असून, पदानुसार वार्षिक वेतन अंदाजे १२ ते १८ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
आरबीआयसारख्या देशातील सर्वोच्च वित्तीय संस्थेत थेट प्रवेशाची ही दुर्मीळ संधी असल्याने पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.