धनंजय मुंडेंची मंत्रिपदावर पुनरागमनाची चर्चा? दिल्ली दौऱ्याने राजकारण तापले

    18-Dec-2025
Total Views |
- कोकाटे प्रकरणानंतर हालचालींना वेग

Dhananjay Munde Image Source:(Internet) 
मुंबई :
मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील सदनिकांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे कब्जा केल्याप्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटे यांना दोषी ठरवले असून, या निकालानंतर नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेचे वॉरंट बजावले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही संकटात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अटक वॉरंट जाहीर होताच माणिकराव कोकाटे हे उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणावर येत्या शुक्रवारी (19 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी एनडीएतील वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. या भेटींमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात असतानाच हा दिल्ली दौरा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. त्या काळातही धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सक्रिय भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा एकदा कोकाटे अडचणीत सापडले असताना मुंडे थेट दिल्लीला रवाना झाल्याने संभाव्य मंत्रिपद बदलाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
कोकाटे यांच्या जागी कोणाला संधी?
माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, कोणत्याही क्षणी त्यांचे मंत्रिपद जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. महायुती सरकारमध्ये जर कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली, तर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्याच्या राजकारणात पुढील घडामोडी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.