Image Source:(Internet)
मुंबई :
महापालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाची चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सखोल चर्चा सुरू झाली असून, भाजपकडून शिवसेनेला पहिली औपचारिक ऑफर देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, भाजपने शिवसेनेला ५२ जागांचा प्रस्ताव मांडला आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीतील दोन्ही पक्षांची ताकद मोठी असल्याने जागावाटपावरून जोरदार खल सुरू आहे.
या संदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपने थेट आकडेवारी सादर करत वॉर्डनिहाय यादी शिवसेनेसमोर ठेवली. ज्या वॉर्डमध्ये शिवसेनेची संघटनात्मक पकड अधिक आहे, अशा ५२ जागा सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेकडून किमान १२५ जागांचा आग्रह धरण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिंदे गटाकडे जवळपास ४७ नगरसेवक होते. त्यामुळे जागावाटपात शिवसेनेचा दावा अधिक असल्याचे मानले जात आहे. येत्या दोन दिवसांत वॉर्डनिहाय सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपकडून मर्यादित जागांचा प्रस्ताव असतानाही शिंदे गटाने निवडणूक तयारीला पूर्ण वेग दिला आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया शिवसेनेने सुरू केली आहे. गुरुवारपासून स्वतः एकनाथ शिंदे या मुलाखती घेणार असून, सर्व विभागांमध्ये अर्ज वाटपाचे कामही सुरू झाले आहे.
भाजपच्या ५२ जागांच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरही शिवसेनेकडून संपूर्ण महापालिकेसाठी तयारी सुरू असल्याने महायुतीतील जागावाटपाचा पेच कसा सुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याने येत्या काही दिवसांत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.