Image Source:(Internet)
नाशिक :
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवत कोकाटे यांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहेत.
मुख्यमंत्री कोट्यातील सदनिकांचे वाटप करताना अनियमितता केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे. या प्रकरणात तक्रारदार अंजली दिघोळे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कोकाटे यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र ते न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले.
दरम्यान, कोकाटे दिवसभर संपर्काबाहेर असल्याची चर्चा होती. नंतर ते रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकेची कारवाई कधीही होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये खळबळ उडाली असून, महायुती सरकारमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. निफाड मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कोकाटे यांना अलीकडेच पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले होते. मात्र, जुन्या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत कोकाटे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अटकेनंतर मंत्रिमंडळ पुनर्रचनेची शक्यता बळावली असून, पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.