Image Source:(Internet)
नागपूर:
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक २०२५-२६ साठी घोषित झाली असून, १५ डिसेंबरपासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ३८ प्रभागांतून एकूण १५९ नगरसेवकांची निवड होणार आहे.
निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत व्हावी यासाठी नागपूर शहराला १० झोनमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी नेमण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी यांना झोननिहाय निर्णय अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, तर तहसीलदार, सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंते सहाय्यक अधिकारी म्हणून कार्य करतील.
महापालिकेची अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून, सध्या नागपूरमध्ये एकूण २४,८३,११२ मतदार आहेत. यात १२,५६,१६६ महिला, १२,२६,६९० पुरुष आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे. शहरभर ३,१६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
मतदानाच्या दिवशी १८ हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जातील, ज्यात शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी, शाळा महाविद्यालयांचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश असेल. उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, अशी माहिती आयुक्त चौधरी यांनी दिली.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर अर्जासोबत पोचपावती सादर करता येईल. निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
निवडणूक प्रक्रियेत सभा, मिरवणूक, वाहन वापर व लाऊडस्पीकरसाठी ‘एक खिडकी’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी FST, SST व VST या पथकांची कार्यवाही चालू राहणार आहे. तसेच, मनपा पातळीवर स्वतंत्र नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे जी निवडणूक जाहिरातींचे निरीक्षण करेल.
उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी झोननिहाय विशेष पथक नेमण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून, मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जाईल. एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीमुळे नागपूर शहरातील राजकारणात जोरदार सक्रियता वाढणार असून, आगामी काळात प्रचाराचा गडगडाट पाहायला मिळणार आहे.