सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार!

    16-Dec-2025
Total Views |
- जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची संयुक्त घोषणा

Mahavikas AghadiImage Source:(Internet) 
सांगली :
सांगली (Sangli), मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असल्याची मोठी घोषणा आज करण्यात आली. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर थेट लोकांमध्ये जाऊन ही निवडणूक लढवू आणि सत्ता मिळवू, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
 
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमानंतर तिघांमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर एकत्र भोजन करत पुढील राजकीय वाटचालीबाबत रणनीती ठरवण्यात आली.
 
या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यांसह इतर पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा झाली. तसेच जागा वाटप, प्रचार यंत्रणा आणि निवडणूक नियोजनावर प्राथमिक पातळीवर विचारविनिमय करण्यात आला.
 
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना शहराचा अपेक्षित विकास साधता आलेला नाही. राज्यातील इतर महापालिकांमध्ये वेगाने विकास होत असताना सांगली, मिरज, कुपवाडकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. हेच प्रश्न केंद्रस्थानी ठेवून महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे.
 
काँग्रेसची या भागात भक्कम ताकद असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर सहकारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही एकत्र लढू आणि महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून, दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
खासदार विशाल पाटील यांनी मतदार यादीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदार क्रमांक, पत्ते, बूथनिहाय याद्या उपलब्ध नसतानाच निवडणुकीची घोषणा होत असल्याने संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. जुलै महिन्यात अंतिम झालेल्या मतदार यादीत त्यानंतर पात्र ठरलेल्या मतदारांचे काय, याचे स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याचेही ते म्हणाले. या परिस्थितीत आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा झाली असून, त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची तयारी आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.
 
याचवेळी त्यांनी आपण काँग्रेसमध्येच असून ताकदीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चार केला.
 
आमदार विश्वजित कदम म्हणाले की, महापालिका निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर लढवली जाणार आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये मतभेद होते, मात्र आता सर्व नेते एकत्र आले आहेत. माजी नगरसेवक जोमाने काम करत असून शहराध्यक्षपदाबाबतचा निर्णयही लवकरच जाहीर केला जाईल.
 
दरम्यान, विशाल पाटील यांनी मागील निवडणुकांचा संदर्भ देत सांगितले की, गेल्या वेळी मतविभाजन झाल्यामुळे नुकसान झाले. मात्र यावेळी तसे होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असून, शिवसेना, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनाही सोबत घेऊन सक्षम पॅनेल उभे केले जाईल. सांगलीचा पुरोगामी मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.