Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यभर थंडीची (Cold) तीव्रता अजूनही जाणवत असून किमान तापमानात झालेली घट नागरिकांसाठी गारठा वाढवणारी ठरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमान कमीच राहिले असून आज धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या कुठेही थंडीची लाट घोषित करण्यात आलेली नसली तरी तापमान घसरल्याने थंडीचा परिणाम तीव्रतेने जाणवत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक वाढली असून निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
उत्तर महाराष्ट्रासोबतच पूर्व विदर्भातील भागांमध्येही थंडीचा जोर कायम आहे. जेऊर येथे किमान तापमान ७.५ अंश, तर गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नागपूर, अहिल्यानगर, मालेगाव आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही थंडीचा प्रभाव जाणवत असून पुढील काही दिवस किमान तापमान कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील गारठा अजून काही काळ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.