Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) साठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर (Tejashwi Ghosalkar) या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता दादर येथील वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असून, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
तेजस्वी घोसाळकर या दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. मागील काही काळापासून त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, मुंबै बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. मुंबै बँकेवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा प्रभाव असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबै बँकेतील नियुक्तीपूर्वी १३ मे रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेतील दहिसर विधानसभा महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अल्पावधीतच त्यांची बँकेच्या संचालकपदी निवड झाली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुंबै बँकेतील एक संचालकपद रिक्त झाले होते. त्या रिक्त जागेवर तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला.
यापूर्वी या विषयावर बोलताना विनोद घोसाळकर यांनी कोणताही पक्षप्रवेश निश्चित नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही सांगितले होते. तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आपण ठाकरे कुटुंबासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले होते.
मात्र आता तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याने, विनोद घोसाळकर पुढील काळात कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी किती मोठा राजकीय फटका ठरेल, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.