Image Source:(Internet)
पुणे :
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युतीबाबत हालचालींना वेग आला आहे. संभाव्य राज–उद्धव (Raj-Uddhav) युतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आज अनौपचारिक ‘चहा पे चर्चा’ पार पडली.
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीतीवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाची ताकद अधिक आहे, स्थानिक समीकरणे काय आहेत, याचा आढावा घेत जागावाटपाबाबत पुढील दिशा ठरवण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, वसंत मोरे, प्रशांत बधे उपस्थित होते. तर मनसेकडून शहरप्रमुख साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, बाळा शेडगे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसेच्या कार्यालयात भेट देणार असून त्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्ष जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे ताकद दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.